ब्युरो टीम : आज विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास सांगितला. यावेळी एक प्रसंग सांगताना ते भावूक झाले. माझी दोन मुलं डोळ्यादेखत गेली. त्यावेळी मी पूर्णपणे खचलो होतो. राजकारणातून, समाजकारणातून बाहेर पडलो होतो, असे सांगताना शिंदे यांची डोळे पाणावले होते.
आज, सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेला बहुमताचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘शिवसैनिक हेच मी माझं कुटुंब मानलं. माझ्या आयुष्यात जेव्हा दुःखद प्रसंग आला. दोन मुलं डोळ्यासमोरुन गेली. माझी दोन मुलं गेली तेव्हा आनंद दिघे यांनी मला आधार दिला. कशासाठी जगायचं आणि कुणासाठी जगायचं असं वाटलं. अनेकदा दिघे साहेब घरी आले. पण मी नाही उभा राहू शकत असं त्यांना सांगितलं. एकदा त्यांनी टेंभी नाक्यावर बोलावलं आणि खांद्यावर हात टाकला. तुला हे दुःख विसरुन दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील हे सांगितलं. त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही, ही आठवण सांगताना शिंदे यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या.
आम्ही जो काही निर्णय घेतला, त्यात वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते. आमच्या सगळ्या आमदारांना ते माहित होतं. पण अजित दादांनी की कुणी तरी सांगितलं एकनाथ शिंदे नको. ही जबाबदारी तुम्हालाच (उद्धव ठाकरे) घ्यायचीय असं सांगण्यात आलं. पण एकदा अजित दादा सहजच बोलून गेले की इथे पण अपघात झालाय. तेव्हा त्यांनी सांगितलं आमचा विरोध असण्याचं कारण नाही. तरी मी ते सगळं विसरुन गेलो. सुरुवातीला मला सांगण्यात आलं आणि नंतर उद्धव साहेबांनाच मुख्यमंत्री व्हायचंय असं ठरलं. मी पदाच्या लालसेपोटी गेलो नाही, असं म्हणत शिंदेंनी आपल्या बंडामागची भूमिका स्पष्ट केली.
टिप्पणी पोस्ट करा