या जिल्ह्यात भाजप-काँग्रेसचे पदाधिकारी आले एकत्र, कारण वाचाच..


ब्युरो टीम : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजपवर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात एका मुद्यावर भाजप व काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आल्याचे दिसले. तो मुद्दा म्हणजे  जिल्हा विभाजन.
अहमदनगर  जिल्हा विभाजनाला मान्यता देणारा ठराव तत्कालीन पालकमंत्री व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन व विकास मंडळाने (डि.पी.डि.सी.ने) यापुर्वीच मंजूर केलेला आहे. राज्य शासनाने देखील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात जिल्हा विभाजनाला  मान्यता दिलेली आहे. मात्र नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या वादामुळे व जिल्ह्यातील काही बलाढ्य नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत होऊ शकली नाही, हे दुर्दैव आहे. दक्षिण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या अशा या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा विभाजन समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांनी केले आहे.
यासंदर्भात आज देशमुख यांनी भाजपाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी देशमुख यांनी गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले. याबाबत सविस्तर माहिती देताना देशमुख म्हणाले,  अहमदनगर जिल्ह्यातील दोन टोकांच्या गावामधील (कर्जत तालुक्यातील  सिध्दटेक ते अकोले तालुक्यातील घाटघर) अंतर २५० किमी पेक्षा जास्त आहे. प्रशासकीय कामकाजासाठी हे अतिशय अडचणीचे आहे. जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागाची स्थिती सर्वच बाबतीत अतिशय भिन्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना लोकसंख्या नव्हे तर जिल्हा घटक धरून बनविलेल्या आहेत.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील लोकांवर मोठा अन्याय होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा विभाजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक आहे.
याबाबत आपण राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असुन याबाबत नव्या सरकारला साकडे घालण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांनाही विनंती करणार आहोत. याशिवाय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची आपण भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने