शिवसेना-राष्ट्रवादीत रंगणार सिनिअर-ज्युनिअर वाद; कोण होणार विधान परिषदेचा विरोधीपक्ष नेता?


 ब्युरो टीम:
  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. मात्र, शिवसेनेच्या आमदारांचे संख्याबळ कमी झाल्याने विरोधात बसल्यानंतर महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झाला आहे. सध्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे गेले होते. त्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या पदासाठी सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.                                                                                                                                                   राज्याच्या विधानपरिषदेत एकूण ७८ आमदार आहेत. मविआत शिवसेनेचे विधानपरिषदेत सर्वाधिक १३ आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेतील आमदारांच्या संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याची भूमिका शिवसेना नेते सचिन अहिर यांनी मांडली आहे. मात्र, विधानपरिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. आमच्याकडे एकनाथ खडसे यांच्यासारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे या पदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून लवकरच विधानपरिषदेच्या सभापतींना पत्र पाठवून या पदावर दावा सांगितला जाणार असल्याची माहिती आहे.                                                          एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळे सध्या शिवसेना विचित्र पद्धतीने विभागली गेल्याचे दिसत आहे. विधानसभेतील ४० आमदारांचा गट हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे. तर विधानपरिषदेतील बहुतांश आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सध्या अनिल परब आणि सचिन अहिर या दोघांची नावे चर्चेत आहेत. मात्र, त्याचवेळी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्याचा विचार केला जावा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेनेत सिनियर विरुद्ध ज्युनिअर असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने