ब्युरो टीम : युवा चेतना फाऊंडेशन आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या संयुक्त विद्यमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 300 स्वयंसेवकांनी 'सगळ्यांचा एकच सूर स्वच्छ करू पंढरपूर' या घोषवाक्याखाली पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान राबविले.
आषाढी वारीनंतर जे घाणीचे सम्राज्य पंढरपूर परिसरात पसरते, ही सर्व घाण या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून साफ करण्यात आली. गेल्या 8 वर्षांपासून युवा चेतना फाऊंडेशन आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम पंढरपूरमध्ये राबविण्यात येते. या वर्षी अहमदनगर, शेवगाव, निघोज, पुणे व सोलापूर येथून जवळपास 300 पेक्षा जास्त स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते. सामाजिक भान ठेवत कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा न ठेवता हे तरुण गेल्या 8 वर्षांपासून ही सेवा करत आहेत.
आषाढी एकादशीनंतर वारकरी आपापल्या घराकडे जातात आणि गर्दी कमी होते, वारकऱ्यांची गर्दी कमी झाल्यावर ही मोहीम हे युवक राबवितात. यामध्ये वेगवेगळे गट तयार करून व प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमून वेगवेगळ्या भागांत हे गट पाठवून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यावर्षी 52 एकरांचे वाखरी वारीतळ, पालखी मार्ग, गोपाळपूर, वाळवंट परिसर, मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ. आदी ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, द्रोण, ग्लास, केळ्यांच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्रभागेतील कपडे जमा करण्यात आले.
यावर्षी या मोहिमेत अमर कळमकर, मिथुन धनराज, सुनील गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके, पांडुरंग राजगुरू, योगेश काकडे, पूनम थोरात, विदुला कुलकर्णी,राणी कळमकर, उमेश आमटे, गणेश दळे, दीपक कर्डीले, अशोक चिंधे, राहुल झिरपे, गायत्री सरोदे, अप्पा बनकर, विक्रम कानवडे, रामेश्वर राऊत, अजिंक्य आंधळे यांच्यासह शेकडो तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते.
तरुणांवर स्वच्छतेचे संस्कार रुजविण्याचे काम : कळमकर
आम्ही सामाजिक भान ठेवत हे अभियान राबवित आहोत. या स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही तरुणांवर स्वच्छतेचे संस्कार देखील रुजवतो, असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'आम्ही स्वच्छेतेमध्ये विठ्ठल पाहतो. ही मोहीम यावर्षी केशव सायकर आणि राहुल आळेकर या दोन स्वयंसेवकांना श्रद्धांजली अर्पण करून सुरवात करण्यात आली. या दोन स्वयंसेवकांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते. तर यापुढेही ही मोहीम अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा