राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंना पुतण्याचा धक्का; एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

 


ब्युरो टीम
: शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिवसेंदिवस पाठिंबा देणाऱ्यांची संख्या कमालीची वाढताना दिसत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असताना आता राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने एन्ट्री केली आहे. माथाडी नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे  यांचे पुतणे सौरभ ऋषिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

      मूळचे साताऱ्याचे असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले आहे. आता साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनीही आपला सातारी बाणा दाखवला आहे. घणसोली येथील एका निवासी संकुलाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्यासमवेत बहुतांशी रहिवासी  व नवी मुंबई येथील सुमारे ३५ नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव होताच सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. 

     सौरभ शिंदे यांना चुलते राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय बाळकडू मिळाले आहे. वडील व माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या गावातील सर्वसामान्य माणूस मोठा होत असेल तर त्याला विरोध करण्यापेक्षा त्यांना पाठिंबा  देण्यात काहीही हरकत नाही, या भावनेतून सौरभ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीत निश्चित फायदा होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने