विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांचा विजय

ब्युरो टीम : विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. 
विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर शीरगणतीद्वारे विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू झाली. मात्र ही मतमोजणी सुरू असतानाच १४ क्रमांकाच्या मतापर्यंत मोजणी जाताच गोंधळ उडाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत काही सूचना केल्या.
शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार १, २, ३ याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिलं आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक २२७ मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक २२६ मधून नगरसेविका आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने