ब्युरो टीम : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला गेला. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर राज्यपालांना लक्ष्य केले. राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलने करून त्यांना घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षांनी केली होती. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेला मराठी मतदार आणि त्याचा शिवसेनेला होणार फायदा विचारात घेता, तो मुद्दा अडगळीत टाकण्यासाठीच भाजपने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचे नाट्य तयार केल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, राज्यपालांच्या या वक्तव्याने जनमत विरोधात जात असल्याचे पाहून भाजपनेही राज्यपालांच्या या वक्तव्याबाबत असहमती दर्शविली होती. विरोधी पक्षांची विशेषतः शिवसेनेची राज्यपालांचा निषेध करणारी आंदोलने जर यशस्वी झाली तर भाजपला मुंबई आणि अन्य महापालिकांच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याचाही शक्यता निर्माण झाली होती. या सर्व बाबींचा विचार करता, नवीन मुद्दा उपस्थित करून जनसामान्यांचे लक्ष्य त्यावरून दुसरीकडे वळवून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा डाव भाजपने खेळला असल्याचीही चर्चा आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शनिवारी दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले. एवढेच काय तर खुद्द भाजप नेत्यांनीही त्यांच्या विधानाला असहमती दर्शवली. राज्यपालांचा निषेध करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष रविवारी रस्त्यावर उतरणार होते. शिवसेनेने तर ‘जोडे मारो’ आंदोलन जाहीर केले होते. मात्र राज्याचा घटनात्मक प्रमुख असलेल्या व्यक्तीच्या विरोधात अशाप्रकारे आंदोलन होणे, भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नव्हतेच.मुळात राज्यपालांच्या या वक्तव्याने मराठी जनतेत प्रचंड रोष उसळला होता. त्यातच विरोधी पक्षांची विशेषतः शिवसेनेचे आंदोलन यशस्वी झाले असते, तर मराठी मतदार पुन्हा शिवसेनेकडे जोडला जाण्याची भीती भाजपच्या नेतृत्वाला वाटली असण्याची शक्यता आहे.
विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न
याच मुद्द्यावर आक्रमक झालेली शिवसेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता होती. संजय राऊत पत्रकारितेच्या माध्यमातून भाजपला धारेवर धरणार हे निश्चित होते. अशावेळी शिवसेनेचा आवाज दाबण्याबरोबरच एका मोठ्या नेत्याला ईडीच्या जंजाळात अडकवून शिवसेनेचे खच्चीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड टाकून राज्यपालांचे प्रकरण थंड करायचे, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोमवारी होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राज्यपालांच्या वक्तव्याचा मुद्दा चर्चेला आणण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे, त्यालाही कुठेतरी खीळ बसविण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
-------------
टिप्पणी पोस्ट करा