उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत पराभूत व्हावेच लागेल; मुनगंटीवारांचा दावा


ब्युरो टीम: 
कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  इतरांना म्हणतात की, माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदीही  तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही २०१९ च्या निवडणुकीवेळी वरळी मतदारसंघातील बॅनर्सवर नरेंद्र मोदी यांचा फोटो का वापरला? असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवारी प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे  गट आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. त्यानंतर या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना संपवायची आहे असाच आरोप ३५ वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत कोल्हापूरच्या सभेत शिवसेना नेत्यांनी शरद पवारांबाबत केला होता.

शिवसेना मोडायचा, संपवायचा डाव शरद पवारांचा आहे. कोण कोणावर आरोप करतो याची सत्यता जनतेला पडताळायची असते. आजची मुलाखत रश्मी ठाकरेंचा सामना, त्याचे संपादक आणि पक्षप्रमुख अशी आहे. त्यामुळे ही कौटुंबिक मुलाखत आहे. यात अडचणीचे ठरतील असे कुठलेही प्रश्न विचारण्यात येणार नाही हे सर्वांना अपेक्षित होते. ही मुलाखत जनतेच्या मनात आपली प्रतिमा बनवण्याचा, सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा, असे उद्धव ठाकरे म्हणतात. इतरांना गद्दार बोलता. सुडाचं राजकारण नको म्हणता. मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला.

खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा पठण करणार नाही, असे म्हटले तरी १४ दिवस त्यांना तुरुंगात टाकले. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकाचा डोळा फोडायचा. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य करूनही तोंडाला कुलूप लावून गप्प बसायचे, असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला. दरम्यान, हुकूमशहाचे राजकारण मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता बघत होती. जनता सार्वभौम आहे. जनतेच्या मनाविरोधात तुम्ही निर्णय घेतला. मग तेव्हा राजीनामे का दिले नाहीत? जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९८ आमदार निवडून दिले त्यांना तुम्ही सत्तेत बसवलं. चुकीच्या माणसांची बाजू घेऊन त्यांना प्रोत्साहित करत होता.

आईनं मुलासाठी स्वयंपाक केला अशी बातमी कधी होऊ शकत नाही. मात्र हे एकमेव मुख्यमंत्री होते जे मंत्रालयात गेल्यानंतर बातमी होते. सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा राजकीय डाव आहे. कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना खंजीर खुपसला, गद्दार म्हणायचे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना पराभूत व्हावेच लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला. भाजपाशी साथ सोडली तेव्हा मुख्यमंत्री होण्यासाठी किती हजार कोटी खर्च झाले? जनतेच्या मनात खूप प्रश्न आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळालीच नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने