केंद्र शासनाच्या स्वनिधी महोत्सवासाठी 'या' तीन महानगरपालिकांची निवड

ब्युरो टीम :  भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशात 'आजादी का अमृतमहोत्सव' साजरा करण्यात येत असून, यानिमित्त 1 ते 31 जुलै या कालावधीत केंद्र शासनामार्फत स्वनिधी महोत्सव देशातील 75 शहरांमध्ये साजरा करण्यात येत आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली या तीन महानगरपालिका आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषदेची निवड करण्यात आली आहे. या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वनिधी महोत्सव आयोजनाच्या तारखा नगरपरिषद संचालनालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्यावतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा स्वनिधी महोत्सव येत्या 16 जुलै रोजी, मूर्तिजापूर नगरपरिषदेचा स्वनिधी महोत्सव 22 जुलै, नागपूर महानगरपालिकेचा स्वनिधी महोत्सव 24 जुलै रोजी तर नाशिक महानगरपालिकेचा स्वनिधी महोत्सव 25 जुलै रोजी आयोजित करण्यात  येणार आहे.

स्वनिधी महोत्सवाअंतर्गत पथविक्रेत्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण, यशस्वी पथविक्रेत्यांचा सत्कार, पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता सांस्कृतिक, खेळ आणि मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पथविक्रेत्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण आणि कर्ज मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. पथविक्रेत्यांचे आणि स्वयं सहायता गटाने उत्पादित केलेल्या वस्तू, पदार्थ यांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन या महोत्सवात करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने