विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे


ब्युरो टीम : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे निर्माण झालेला संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हा पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे. यावरुन कायदेशीर वाद सुरु असतानाच आता विधिमंडळातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयातील कर्मचारी रविवारी सकाळपासून कार्यालयाबाहेरच बसून आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वादामुळे हे कार्यालयच सील  करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. शिंदे गटाने ही कुरघोडी की शिवसेनेने त्यांना रोखण्यासाठी ही सूचना केली याबाबत चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे विधिमंडळातील पहिली लढाई ही तुर्तास भाजपने जिंकली आहे. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षाच्या व्हिपविरोधात मतदान केले, याची नोंद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून घेण्यात आली. सभागृहाच्या पटलावर याची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने