शिंदे-फडणवीस ऑन फिल्ड, गडचिरोलीत पूर परिस्थितीची केली पाहणी.


       ब्युरो टीम : राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित होऊ लागले असून नदी, नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आता ऑनफिल्ड उतरल्याचे चित्र दिसत आहे. 

     गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून त्यांनी पाणीपातळी आणि उपाययोजनासंदर्भात माहिती घेतली.

     एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपुरात शिंदे-फडणवीसांनी विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले, व तेथील पूर परिस्थितीची पाहणी केली.

      दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा पाचही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पाचही तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद आहे. सध्या जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी नदी नाल्याला पूर परिस्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने