वे घर नहीं लौट पाते, संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत

ब्युरो टीम : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर नरेंद्र सक्सेना यांच्या कवितेतील ओळी ट्वीट करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांचा उल्लेख न करता टीका केली आहे.
राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, “सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है… वे घर नहीं लौट पाते” या ट्वीटसोबत त्यांनी आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोदेखील दिसत आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी यापूर्वी देखील अनेकदा ट्वीटर आणि कवितेच्या माध्यमांतून बंडखोर आमदार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. या राजकीय घडामोडी घडत असताना बंडखोर आमदार आणि शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने