ब्युरो टीम : जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली बसला मध्यप्रदेशमध्ये अपघात झाला आहे. ही बस पुलावरुन खाली कोसळली असून या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (MH40 N9848) होती. बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.
खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करीत या अपघाताबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलयं, ‘इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत. काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो.’
दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा