भाजपने खेळली नवी खेळी, नार्वेकरांना दिली उमेदवारी


ब्युरो टीम :  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकर हे याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष बदलून आले आहेत. त्यामुळे भाजप हायकमांडने ही नेमकी कुठली खेळी खेळली आहे, याची चर्चा रंगली आहे. 
नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. ते आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने मोठा भूकंप झाला होता.
राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर धरला. आता भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते विद्यमान आमदार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने