निर्यात वाढविण्यासाठी कृषी उत्पादनांची गुणवत्तावाढ आवश्यक : गडकरी


ब्युरो टीम : विदर्भातून फळ, फुले, भाज्या आदी कृषी उत्पादनांची निर्यात वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आवश्यक आहे. कृषी उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, सुरक्षिततेबाबतचे सर्व निकष पूर्ण करणे, उत्तम पॅकेजिंग गरजेचे आहे. विदर्भातून निर्यात वाढविण्यासाठी ‘अपेडा’ व ‘ॲग्रोव्हिजन’च्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) व ॲग्रोव्हिजन फौंडेशनतर्फे ‘विदर्भातील कृषी उत्पादन आणि भाजीपाला निर्यातीची संधी’ या विषयावरील कार्यक्रम येथील हॉटेल रंगोली पर्ल येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, ‘अपेडा’चे संचालक तरूण बजाज, सदस्य आनंदराव राऊत, विभा भाटिया, दिलीप घोष, फौंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, मनीष मोंढे, श्रीधर ठाकरे, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कृषी निर्यातवृद्धीसाठी संयुक्त कार्यक्रम राबविण्याबाबत ‘अपेडा’ व ॲग्रोव्हिजन फौंडेशनमध्ये यांच्यात झालेला करार यावेळी श्री. बजाज व श्री. बोरटकर यांनी स्वाक्षांकित केला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, विदर्भातील कृषी निर्यात वाढविण्यासाठी प्रयोगशीलता, नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. निर्यातीसाठी उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. चांगल्या रोपवाटिका ठिकठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत. खत, औषध फवारणीसाठी ड्रोनने स्प्रेईंग करण्यासारख्या नव्या व उपयुक्त बाबी सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्पादनाची सुरक्षितता हा जागतिक बाजारपेठेत महत्वाचा मापदंड मानला जातो. कृषी उत्पादनात कीडनाशकाचे अंश आढळले तर माल नाकारला जातो. हे टाळण्यासाठी सेंद्रिय प्रक्रिया करतानाच उत्पादनात वाढ व गुणवत्ताही टिकून राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विविध स्तरांत प्रयोग होत आहेत.

अलीकडच्या प्रयत्नांतून विदर्भात संत्र्यांच्या उत्तम नर्सरी तयार करण्यात आल्या आहेत. त्या अधिक विकसित व्हाव्यात. स्पेनसारख्या देशातून संत्र्याची उत्तमोत्तम रोपे आणून ती रुजविण्याचा प्रयोगही होत आहे. खारपाणपट्ट्याचे वैशिष्ट्य असलेल्या चवदार तूर डाळीचेही ब्रँडिंग होत आहे.  वर्धा जिल्ह्यात सिंदी येथे ड्राय पोर्ट सुरू करण्यात आला असून, त्यामुळे निर्यातीला गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विदर्भातून संत्रा निर्यातीचा आलेख उंचावत असून, त्यात बांगलादेशासह आता युनायटेड अरब अमिरातमध्येही निर्यात वाढली आहे. देशाची एकूण कृषी उत्पादनांची निर्यात ४ लाख कोटी असल्याचे श्री. बजाज यांनी सांगितले. श्री. मोंढे, श्री. ठाकरे, श्री. बोरटकर यांचीही भाषणे झाली. श्री. सूर्यवंशी यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने