ब्युरो टीम: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीआणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागे सध्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीच्या चौकशीचा ससे मिरा लागला आहे. ईडी कडून राहुल गांधी यांची अनेक दिवस सलग चौकशी झाले आहे, तर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा चौकशीला बोलावलेलं आहे. मंगळवारी त्यांना चौकशीला बोलावल्यानंतर देशभरातील काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसने देशभरात आक्रमक आंदोलन केली, यावेळी पोलिसांनी काही ठिकाणी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणण्याच्या भावनेने आणि सूडबुद्धीने ही कारवाई सुरू आहे, असा थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. अशातच आता राज्यातील काँग्रेस नेतेही आक्रमक झाले आहेत. या ईडी चौकशीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपला थेट दमच भरला आहे.
यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?
सोनिया गांधींना का त्रास देताय? कशासाठी काय कारण आहे? हे आता कोणी खपून घेणार नाही, तर सोनिया गांधींना जर हात लावला तर देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. त्यामुळे ही आंदोलनं आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ईडी चौकशीचे संसदेत पडसाद
राजधानी दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून बराच गदारोळ झाला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात आक्रमक झालेल्या आणि गदारोळ करणाऱ्या चार खासदारांचं निलंबनही करण्यात आलेलं आहे. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत इतर नेते आंदोलन करताना दिसून आले. त्यांनाही मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे ईडी चौकशीवरून ससदेतलं राजकारणही बरंच तापलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका
अमरावती जिल्ह्यात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे तब्बल दीड लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाला आहे, शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व अमरावती अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी अमरावतीच्या माजी पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली, एक महिना झाला तरी देखील मंत्रिमंडळ नाही, त्यामुळे महाराष्ट्र बेवारस झाला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढली आहे, या काळात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, शिंदे सरकार राजकारण करत आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.
.... अनिरुद्ध तिडके
टिप्पणी पोस्ट करा