द्रौपदी मुर्मू, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती

ब्युरो टीम : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, सोमवारी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.
द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्यांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा एकतर्फी लढतीत पराभव करून गुरुवारी इतिहास निर्माण केला. खासदार आणि आमदारांची ६४ टक्के वैध मते मिळाल्यानंतर मुर्मू यांनी सिन्हा यांच्याविरुद्ध प्रचंड मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. सिन्हा यांना ३,८०,१७७ तर मुर्मू यांना ६,७६,८०३ मते मिळाली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. तसेच देशातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या त्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
आज, सकाळी सव्वादहा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी समारंभ होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देतील. शपथविधीनंतर त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भाषण करतील, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे.
या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी, सरकारी विभागांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभाच्या समारोपानंतर, मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना आंतर-सेवा गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने