राष्ट्रपती निवडणूक : फोडाफोडीच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होणार ?

ब्युरो टीम : देशाचा नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी आज, सोमवारी देशभरात मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीप्रमाणेच क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. निकाल आल्यावर सगळे काही स्पष्ट होईल, असे महाजन यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मविआची आणखी २० मतं फुटतील, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपच्या बाजूने १६४ आमदारांनी मतदान केले होते. मात्र, भाजपचे नेते द्रौपदी मुर्मू यांना २०० पेक्षा अधिक आमदार मतदान करतील, असा दावा करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे १५ आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असे जाहीर केले होते. त्यामुळे ही मतं वगळली तरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मविआची आणखी २१ मतं फुटतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीतही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील फोडाफोडीच्या पॅटर्नची पुनरावृत्ती होईल, अशी चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने