मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘नाईट किंग’, शिवसेनेची जोरदार टीका


ब्युरो टीम : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाने एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेलं सरकार हे ‘उधारीचं सरकार’ असल्याची टीका करतानाच शिवसेनेनं शिंदे-फडणवीस महाराष्ट्राचे तीन तुकडे करतील असा दावा केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केलेल्या भाषणावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. शिंदेंनी भाषणादरम्यान रात्रीच्या भेटीगाठींबद्दल केलेल्या उल्लेखावरुन शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘नाईट किंग’ असा केला आहे.

'सामना' मधील अग्रलेख वाचा शब्द अन् शब्द जशाचा तसा (सौजन्य - दैनिक सामना )

महाराष्ट्रात शिंद्यांचे सरकार आले व पंतप्रधान मोदी यांनी वचन दिले की, ‘महाराष्ट्राला काहीच कमी पडू दिले जाणार नाही.’ दिल्लीचे सरकार राज्यातून शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते. राज्य गेल्याशिवाय महाराष्ट्राला त्याचे हक्क द्यायचे नाहीत असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला हवे ते देऊ. त्या बदल्यात ही जोडगोळी भाजपला पुढच्या विधानसभेत दोनशे जागा मिळवून देणार आहे. नशीब विरोधकांचे की, त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही. फुटीर गटाचे नेते व मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगतात, ‘‘त्यांच्याबरोबर गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही.’’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखविलेला अविश्वास म्हणावा की, जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास? त्याच वेळी श्री. आदित्य ठाकरे यांनी आव्हान स्वीकारून सांगितले आहे की, ‘‘पळून गेलेले आमदार पुन्हा निवडून कसे येतात ते पाहू.’’ आदित्य ठाकरे म्हणतात त्या विधानात जास्त जोर आहे. श्री. शिंदे यांच्या अंगास नव्याने हळद लागली आहे. त्यामुळे त्यांचे आत्मविश्वासपर बोलणे समजून घेतले पाहिजे. फडणवीस व ते कशा गुपचूप पद्धतीने भेटत होते याचे रहस्यमय किस्से शिंदे यांनी सांगितले. आमदार झोपल्यावर ते निघायचे व उठण्याआधी परत यायचे. अशा प्रकारे हे दोन ‘नाईट किंग’ काम करीत होते. आता दोनशे जागा निवडून आणण्याचा त्यांचा वायदा आहे. बाजारात नेहमी उधारी चालत असते. उधारी म्हणजे काय? माल आधी काही दिवस गिऱ्हाईकाने ताब्यात घ्यायचा व त्याचे पैसे दुकानदारास मागाहून द्यायचे. ती उधारी कधी कधी बुडवली जाते. शिंदे-फडणवीसांची ही वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’ आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. पक्ष सोडताना त्या सर्व प्रकारास नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून नारायण राणे, छगन भुजबळ वगैरे नेते जसे भावुक झाले होते, तोच आव मुख्यमंत्री शिंदे यांनी आणला. ते हेलावले, अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे बरेच नाट्य घडले. राणे, भुजबळांनी विधानसभेत हेच संगीत नाटक केले होते. त्यापेक्षा शिंदे यांचे नाट्य वेगळे नव्हते. शिंदे यांचे नवीन नाटक रंगमंचावर आल्याने राणे यांच्या दशावतारी नाटकावर पडदा पडला आहे. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या वगैरे विद्रोही नाटककारांवरही लोखंडी चणे चावत बसण्याची वेळ आली. संजय राठोड, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव दांपत्यावर कालपर्यंत लिहिलेल्या संहिता मिठी नदीत फेकून देण्याची आफत आता भाजपवाल्यांवर आली आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्यांना तर धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असेच वाटत असेल. दोन दिवसांत या मंडळींना तुरुंगात टाकण्याचे संवाद आता जाहीर पत्रकार परिषदांतून कोण फेकणार? कारण या सगळ्यांनाच भाजपने ‘शुद्ध’ करून घेतले व देवघरात त्यांच्या प्रतिमा पूजेसाठी ठेवल्या. हे सर्व हिंदुत्वाचे व अन्यायाचे परिमार्जन अशा उदात्त नावाखाली झाले. प्रश्न इतकाच आहे की,

सध्याचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’ आहे. त्यामुळे ही उधारी चुकवायची कशी? हाच प्रश्न आहे. शिवसेनेसाठी आपण कसा त्याग केला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. राणे व भुजबळांचेही तेच सांगणे होते. त्यागाच्या बदल्यात काय व किती मिळाले याचाही हिशेब द्यायला हवा. श्री. शिंदे यांचे एकवेळ मान्य करू, पण त्यांच्याबरोबर गेलेल्या किमान 25 आमदारांनी शिवसेनेसाठी कोठे रक्त सांडले, कोठे लाठ्या खाल्ल्या, घरावर कधी तुळशीपत्र ठेवले हे राज्याच्या जनतेला सांगितले तर बरे होईल. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना गिळत होती म्हणून बाहेर पडलो’’ या पालुपदास अर्थ नाही. भाजपबरोबर सत्तेत असताना वेगळे काय घडले होते? भाजपने प्रत्येक वेळी शिवसेनेचे पाय कापण्याचे व पंख छाटण्याचेच काम केले आणि त्याच विद्रोहाच्या ठिणगीतून महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या सरकारमध्ये सुरुवातीलाच शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर त्यांचे मत आजच्यापेक्षा वेगळे असते. शिंदे यांनी आज शिवसेना फोडून नवे राज्य आणले ते भाजपच्या मदतीने. ते त्यांनाच लखलाभ ठरो. शिंदे-फडणवीस यांच्या येण्याने महाराष्ट्राला सर्वकाही मिळेल. काहीच कमी पडू दिले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी सांगतात. ते बुलेट ट्रेन देतील, जीएसटीचा परतावा देतील, आरेतील जंगलतोड करू देतील, ‘ईडी’च्या चौकश्या बंद करतील. त्या बदल्यात फक्त मुंबईसह महाराष्ट्राचे तीन तुकडे शिंदे-फडणवीसांकडून करून घेतील. मराठी माणसाचे खच्चीकरण व महाराष्ट्राचा अवसानघात करतील, दुसरे काय होणार!

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने