मला आपल्याशी बोलायचंय... ठाकरेंसोबतच्या एकमेव 'अपक्ष' माजी मंत्री शंकरराव गडाख फेसबुक पोस्ट

   


ब्युरो टीम: राज्यातील सत्तांतरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाम राहिलेले अपक्ष आमदार आणि माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोमवारी (११ जुलै) मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे ते नेमके काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.

          सत्तांतर नाट्यात सहयोगी पक्षाचे एकटे गडाखच ठाकरे यांच्यासोबत उरले. त्यांनाही शिंदे गटाकडून संपर्क झाला होता. मात्र, ते तिकडे गेले नाहीत, असेही सांगण्यात येते. या सर्व घडामोडींवर त्यांनी मतदारांशी भाष्य करण्याचे ठरविले आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मला आपल्याशी बोलायचंय..!

  नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना, त्यातूनन झालेले आरोप-प्रत्यारोप, सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडीवर मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे. सोमवारी ११ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनई येथे आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती, असे आवाहन त्यांनी या पोस्टमध्ये केले आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 मधल्या घडामोडींमध्ये गडाख शांत होते. ते ठाकरे यांच्यासोबत असले तरी त्यांनी कोणतेही जाहीर वक्तव्य केले नव्हते. घडामोडी घडत असताना ते मुंबईतच होते. सुरूवातीला काही काळ आजारी असल्याने ते रुग्णालयात होते. त्यानंतर मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेत होते. विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी या दोन्ही वेळी ते मतदानात सहभागी झाले. महाविकास आघाडीच्या बाजूनेच त्यांनी मतदान केले. त्यानंतर ते मतदारसंघात परतले आहेत.       

           आता त्यांनी कार्यकर्त्यांची संवाद साधायचा मानस व्यक्त केला आहे. मधल्या काळात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर जुन्या सरकारचे अनेक निर्णय फिरविले जात आहेत. अनेक कामे रद्द केली जात आहेत. त्यामध्ये पूर्वी गडाख यांच्याकडे असलेल्या जलसंधारण खात्यातील कामांचाही समावेश आहे. या खात्यामार्फत मंजूर झालेल्या कोट्यवधी रूपयांची कामे नव्या सरकारने रद्द केली आहेत. याशिवाय जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता गडाख काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागले आहे.                

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने