ब्युरो टीम: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातच उभी फूट पडल्याचे चित्र आहे. येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलाय. मात्र बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंशीच एकनिष्ठ राहण्याचा निर्णय़ घेतलाय. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपण शिवसेनेतच राहणार असून अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जळगावात शिंदे गटात गेलेल्या आमदार किशोर पाटील यांना पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातूनच आव्हान मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र वैशाली सूर्यवंशी यांनी या शक्यता सध्या तरी नाकारल्या आहेत. मी राजकारणाऐवजी समाजकारणावर लक्ष केंद्रीत करत असून सध्या तरी उमेदवारीचा विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या कुटुंबात उभी फूट
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि निर्मल गृह उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कै. आर. ओ पाटील यांचं मतदारसंघात मोठं प्रस्थ आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार किशोर पाटील यांच्याकडे राजकीय वारसा आला. शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीत सुरुवातीपासून साथ दिली. सूरत, गुवाहटी, गोवा, मुंबई या सर्व प्रक्रियेत ते शिंदे गटात सक्रिय होते. किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर मतदारसंघातून त्यांना फार विरोध झाला नाही. ते परतल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढण्यात आली. त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून महाआरतीदेखील करण्यात आली. मात्र आता आर ओ पाटील यांच्या कन्या आणि किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
वैशाली पाटील यांच्या बॅनरची चर्चा
जळगावात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लावलेल्या बॅनरचीच जास्त चर्चा आहे. उद्धव ठाकरेंना शुभेच्छापर जाहिरातीदेखील दिल्या आहेत. एवढे दिवस राजकारणात त्या थेट सक्रिय नव्हत्या. मात्र आजच्या जाहिरातींमुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा रंगली आहे. वडिलांच्या विचारांनुसारच यापुढे वाटचाल करणार असून मातोश्रीशी एकनिष्ठ राहण्याचे वडिलांचे स्वप्न मी पूर्ण करेन, असे संकते त्यांनी दिले आहेत
‘उमेदवारीचा सध्याच विचार नाही’
वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र उमेदवारीसाठी मी अशी भूमिका घेतलेली नाही, असे म्हटले आहे. शिवसेना होतीच पण तात्यासाहेबांनी जे शिवसेनेला बळ दिलं. शिवसेनेचं इथं कुटुंब तयार झालं. त्या कुटुंबाला कुठे सोडायला नको म्हणून मी ही भूमिका स्वीकारली आहे. राजकारणापेक्षाही समाजकारणात रस आहे. मला तात्यासाहेबांचं नाव चिरंतन ठेवायचं आहे. शिवसेनेत जो आदेश दिला तो पाळला जातो. मी ओरिजनल शिवसैनिक आहे. शेवटपर्यंत मातोश्रीशी एकनिष्ठ राहणार असल्याचं वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितलं.
.... अनिरुद्ध तिडके
टिप्पणी पोस्ट करा