अब्दुल सत्तारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेनं आखली रणनिती


ब्युरो टीम
:सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी येत्या 31 तारखेला औरंगाबादेत भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने सत्तार हे शिंदेंना घेऊन आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार आहे. याच दिवशी मोठी रॅली देखील काढण्यात येणार आहे. दरम्यान, सत्तार यांच्या या मेळाव्यानंतर शिवसेनेनं त्यांना धडा शिकविण्यासाठी रणनिती आखली आहे.

बंडखोर सत्तारांना धडा शिकविण्यासाठी आता शिवसेनाही सत्तार यांच्या मतदारसंघात भव्य मेळावा घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर शिवसेनाही सत्तार यांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करेल असं खैरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच सिल्लोडकरांना एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'अब्दुल सत्तार हे सिल्लोडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणून शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यांचं शक्तीप्रदर्शन होऊ द्या. त्यानंतर आम्ही सिल्लोडमध्ये शक्तीप्रदर्शन करू'. सत्तार यांची ही सर्व धडपड कॅबिनेट मंत्रीपद मिळण्यासाठी सुरू असल्याचा टोलाही खैरे यांनी लगावला आहे. सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रीपद न मिळण्याची भीती वाटते त्यामुळेच त्यांनी शिंदे यांचं लक्ष वेधण्यासाठी हे शक्तीप्रदर्शन करत असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

 दरम्यान, येत्या 31 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबादमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील सिल्लोड मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मेळावा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या पाचही आमदारांद्वारे यावेळी औरंगाबाद विमानतळापासून सिल्लोड मतदार संघापर्यंत या दिवशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे.

बंडखोर आमदारांच्या या शक्तिप्रदर्शनातून औरंगाबाद शिवसेनेतील बंडाची ताकद अधोरेखित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र आहे. मात्र, ठाकरे गटातील औरंगाबादेतील दोन प्रमुख नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी आपण या शक्तीप्रदर्शनला घाबरत नसल्याचा म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने