पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण-भावात झाले एकमत; जाणून घ्या खरा विषय ....


ब्युरो टीम
:राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणं राज्य निवडणूक आयोगानं कमी पाऊस असलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे एकमत झाल्याचे पाहायला मिळत असून यामुळे ओबीसी समाज दोघांच्या भूमिकेचे स्वागत करताना दिसत आहे.                                                                                                                                                                         धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यात, ओबीसी आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे, त्यामुळे राज्यातील जाहीर ९२ नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. नवीन सरकारने तातडीने याबाबत कार्यवाही केली पाहिजे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली आहे.

          दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी देखील यावर ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की,"काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून  ओबीसी जनतेला न्याय मिळेल हा विश्वास आहे",असं पंकजा मुंडे म्हणाल्या                                                                                                                           

           पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत  भूमिका जाहीर करत एकी दाखवली आहे. यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी राजकीय आरक्षण मिळणार का हे पाहण्याची उत्सुकता ओबीसी समाजमध्ये दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने