भाजपचे प्रदेशाध्यक्ष राम शिंदे होणार ? नेमकी काय सुरू आहे चर्चा


ब्युरो टीम :   शिंदे गटाच्या साथीने भाजपने राज्याची सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं असलं तरी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत  पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यावी, याबाबत आता भाजपमध्ये विचारमंथन सुरू झालं असून यामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे नेते आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवणाऱ्या राम शिंदे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही. पक्षाने दिलेली गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. राम शिंदे पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान पाहून भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना विधानपरिषदेतही पाठवलं आहे. 
शिंदे यांच्यासोबतच  आशिष शेलार यांच्या नावावर सुद्धा विचार केला जात आहे. आमदार आशिष शेलार यांनी याआधी भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. शेलार यांच्या कार्यकाळात भाजपने मुंबईत विविध निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे शेलार यांच्या संघटन कौशल्याचा राज्यपातळीवरही पक्षाला फायदा व्हावा, यासाठी त्यांना प्रदेशाध्यपद देण्यात येऊ शकते.  भाजप कडून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली बाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नसला तरी, आगामी काळात चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यपद सोडतात का आणि त्यांनी पद सोडल्यास ही जबाबदारी कोणाकडे देण्यात येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने