फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदारांचे मानले आभार

ब्युरो टीम : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला होता. विधानसभेत बहुमताचा हा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने सरकारने जिंकला. ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलण्यासाठी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. यावेळी त्यांनी बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर राहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले. 
फडणवीस म्हणाले, ‘ ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, त्यांचे आभार मानतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार, त्या 'अदृश्य' हातांचेही मनापासून आभार.’
सभागृहाच्या प्रथेप्रमाणे बहुमत प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हेदेखील अगदी शेवटच्या क्षणी धावतधावत सभागृहात दाखल झाले. अनेक आमदार बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर असल्याने सभागृहातील महाविकास आघाडीच्या मतांची संख्याही कमी झाली. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १०७ मते होती. मात्र, आज बहुमत प्रस्तावाविरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ९९ इतकीच होती. ही संधी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच साधली, व आपल्या भाषणातून गैरहजर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानत एकप्रकारे उपरोधिक टीका केली.  बंड

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने