मासिक पाळीत झाड लावलं तर ते जळतं, शिक्षकाच्या अजब दाव्याने चाकणकर संतापल्या

ब्युरो टीम: एकीकडे देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतिपदावर एका आदिवासी महिला विराजमान होते. तर, दुसरीकडे आदिवासी भागातीलच एका तरुणीला वृक्षारोपण करण्यापासून थांबवलं जातं. नाशिकच्या इगतपुरी येथील त्र्यंबक देवगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये आझ एक अजब प्रकार घडला. येथे एका आदिवासी महाविद्यालयीन तरुणीला मासिक पाळी असल्याने शिक्षकाने तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं, तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावला. घडलेल्या या प्रकाराने सध्या नाशिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेत घडलेला सर्व प्रकार विद्यार्थिनीने घरी पालकांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या सांगण्यावरून आदिवासी विकास विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश अप्पर आयुक्तांनी दिले आहेत. या सर्व प्रकरणाची महिला आयोगानेही गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केलीय.या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच संतापल्या. त्यांनी या घटनेची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, २१ व्या शतकातही अशा संतापजनक घटना घडत असतील तर यावर कठोर कारवाई होणे अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत सविस्तर कायदा निर्माण होऊनही विद्यार्थ्यांना धडे देणारा शिक्षकच असे कृत्य करत असेल तर मुलांच्या भविष्याचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यात देशाची प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला विराजमान होत असतांना अशी आदिवासी महिलांची प्रतारणा होत असेल तर याचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने