शिंदेंचा ठाकरेंना झटका, शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आता शिवसेनेचा राहिला एकच नगरसेवक!

ब्युरो टीम : ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे ६६ नगरसेवक  शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे अस्तित्त्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात शुन्यातून संघटना उभारावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
ठाणे महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात २०१७ मध्ये प्रथमच शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठता आला होता. ठाणे महागनरपालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबर झटका दिला  असला तरी एक नगरसेवक अद्यापही शिवसेने सोबत आहे.  शिवसेनेच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या आहेत. नंदिनी विचारे यांच्या रुपाने आता ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक उरला आहे. मात्र, कालच शिवसेनेने लोकसभेतील प्रतोद पदावरून भावना गवळी यांची उचलबांगडी केली होती. त्यानंतर मुख्य प्रतोद पद हे राजन विचारे यांना देण्यात आले होते. त्यामुळेच की काय उर्वरित ६६ नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली असताना नंदिनी विचारे या शिवसेनेसोबत असल्याची चर्चा रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने