ब्युरो टीम: गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जाणार आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच सोशल मिडियावर आला आहे. या प्रोमो मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावल्याची दिसत आहे. यावेळी महिलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला, तेही गुजराती भाषेतून.. हा विडिओ सध्या व्हायरल होत आहे.
यावेळी सुबोध भावेनं सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारला. मध्यंतरी, सुप्रिया सुळे भाकरी भाजतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओनंतर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांनी ‘घरी काम करा’ असा सल्ला सुप्रिया सुळे यांना दिला होता. या प्रसंगाची आठवण करून देत, याबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी मजेदार प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला खरं तर त्यांच्या या सल्ल्याचं फार काही वाईट वाटलं नाही कारण मी एक महिला आहे आणि एक गृहिणी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घरात स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही. कारण दिवसभर तुम्ही कितीही काम केलं तरीही जेव्हा घरी जाता तेव्हा तुम्हाला घरचंच जेवण लागतं. इथे सेटवर जेव्हा तुम्ही जेवता तेव्हाही पहिला घास घेतल्यानंतर तुम्हाला घरच्या जेवणाची आठवण येते. त्यामुळे घरच्या जेवणाला पर्याय नाही.' असं त्या म्हणाल्या. एवढेच नाहीतर त्या म्हणाल्या, 'तुम्ही लवकरच घरी जेवायला या, मी खास बेत करते.
'पुढे त्यांना नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवण्यात आला, या फोटोला पाहून सुप्रिया सुळे चक्क गुजराती भाषेत बोलल्या. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच्या आठवणी त्यांनी ताज्या केल्या. तर मोदीजी तुम्ही पार्लमेंटमध्ये या, हल्ली तुम्ही येत नाही असंही त्या म्हणाल्या. या शिवाय गुजराती भाषेतून अगदी सहजपणे त्या मोदी यांच्याशी बोलत होत्या,. हा संवाद पाहून सारेच अवाक झाले. पुढे त्यांनी अशाच पद्धतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ही संवाद साधला. एकनाथजी लवकरात लवकर खातेवाटप करा, चिन्हाचंही लवकर मिटवून घ्या म्हणजे मतदार संघातील कामे मार्गी लागतील, असंही त्या म्हणाल्या.
.... अनिरुद्ध तिडके
टिप्पणी पोस्ट करा