ये क्या हो रहा है? अस्लम शेख देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला...

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री अस्लम शेख यांनी एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मालवणी,मढ,मार्वे परिसरात २८ स्टुडिओंचे व्यावसायिक बांधकाम अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने नियमांचं उल्लंघन करून करण्यात आलं, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. आज काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अस्लम शेख आणि मोहित कंबोज या दोघांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे.
           किरीट सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यापैकी ३०० कोटी प्रकरणी कागदपत्र संबंधित यंत्रणांकडे दिल्याचा सोमय्यांनी दावा केला होता. त्यानंतर दोन दिवसातच अस्लम शेख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. यावेळी दोघेही एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मोहित कंबोज अस्लम शेख यांच्या सोबत असल्यानं तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर अस्लम शेख आणि मोहित कंबोज आमने सामने आले होते. मात्र, आजच्या भेटीदरम्यान दोघांधील तणाव देखील निवळल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं आगामी काळात शिवसेनेप्रमाणं काँग्रेसला तर धक्का बसणार नाही ना, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
           आता अस्लम शेख आणि मोहित कंबोज यांनी एकत्रित देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारण ये क्या हो रहा है? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने