गुड न्यूज ! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त


ब्युरो टीम : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी मागची कहाणी सांगितली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं की, 'एखादा आमदार असो वा खासदार, तो नेहमी विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही सत्तेत असताना विचारांसाठी हे पाऊल उचललं. माझ्यासोबत आलेले अनेकजण मंत्री होते, स्वत:चं मंत्रीपद धोक्यात घालून ते माझ्यासोबत आले,'  असेही शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले,'माझं खच्चीकरण कसं झालं? हे सुनील प्रभूंना देखील माहीत आहे. शेवटी हा एक शिवसैनिक आहे, काही व्हायचं ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईल पण बाकी सारे वाचतील. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही काहीही चिंता करू नका. तुमचं नुकसान होतंय, असं मला जेव्हा वाटेल त्यादिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा कायमचा निरोप घेऊन निघून जाईन, हे मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं,' असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने