ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीस काल, गुरुवार पासून सुरुवात झाली. ९ जुलैपर्यंत ही बैठक आहे. राजस्थानमधील झुन्झुनू येथील खेमी शक्ती मंदिरात बैठक सुरू आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी याविषयी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
या बैठकीमध्ये संघटनविषयक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. प्रांत प्रचारक आपापल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीची माहिती बैठकीमध्ये सादर करतात. संघाचे संपूर्ण देशभरात आयोजित प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गांची आकडेवारी, नवनवे उपक्रम आणि त्यांचे विश्लेषण, आगामी वर्षाची कार्ययोजना या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होईल, त्याचप्रमाणे संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत कार्यविस्तार, दृढीकरण आणि सामाजिक सहभागाच्या त्रैवार्षिक योजनेचीही समीक्षा केली जाणार असल्याचे आंबेकर यांनी पत्रकामध्ये म्हटले आहे.
या बैठकीत देशभरातील सर्व ४५ प्रांतांचे प्रांत तसेच सह प्रांतप्रचारक उपस्थित आहेत. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संघाच्या सहा कार्यविभागांचे प्रमुख, अ. भा. कार्यकारिणीचे प्रचारक सदस्य, वनवासी कल्याण आश्रमाचे अतुल जोग, भारतीय मजदूर संघाचे सुरेंद्रन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, विद्याभारतीचे गोबिद मोहंती, विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे आणि भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोषदेखील बैठकीस उपस्थित आहेत.
टिप्पणी पोस्ट करा