ब्युरो टीम: सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. उदयनराजे भोसले यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा साधणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंना लक्ष्य केलं आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा एकदा प्रसिद्धी पत्रक काढत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. "गेल्या पाच-सहा वर्षात नगर पालिकेला अक्षरशः धुवून खाल्लं. टक्केवारी, कमिशन, टेंडर आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी सत्तारूढ आघाडीत एकमेकांचे गळे धरणे आणि मारामाऱ्या करणे, ही अनोखी परंपरा सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलीआहे. त्यामुळे चोर कोण आणि लुटारू कोण हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय. तुम्ही शहराच्या विकासासाठी वेगळं केलंय तरी काय, असा सवाल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे, "नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविणे हे तर नगर पालिकेचे कामच आहे. पण, तुम्ही ज्या विकासकामांची जंत्री जाहीर केली. त्यातील एकतरी काम सातारकरांच्या उपयोगाचं आहे का? भुयारी गटर योजनेची वर्क ऑर्डर २०१८ ला निघाली. आजही या योजनेचं काम पूर्ण नाही, किंबहुना हे काम कधी पूर्ण होणार हे कोणालाच माहिती नाही. या योजनेमुळे शहरातील चांगल्या रस्त्यांची अक्षरशः धूळधाण झाली आणि हाच मुद्दा खासदार महोदयांना बोचला."
"घनकचरा प्रकल्पाची तर तऱ्हाच न्यारी आहे. कचरा डेपोतील कचऱ्याचे ढीग रिकामे होणे अपेक्षित असताना कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. हि योजना सपशेल फेल गेली असून, केवळ ठेकेदाराला पोसण्याचा उद्योग सुरु आहे. ग्रेड सेप्रेटर म्हणजे तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. राजवाड्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जायला मार्ग असणे आवश्यक होते, मात्र ग्रेडसेपरेटर म्हणजे नेमकं काय करून ठेवलंय हे एक कोडंच सातारकरांना पडलं आहे. यातही केवळ पैसे वाया घालवण्याचा प्रकार झाला आहे", अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.
"शिवतीर्थ म्हणजे सातारकरांची अस्मिता आणि शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय. शिवतीर्थ म्हणजे प्रेरणास्थान. मग या कामासाठी लागणाऱ्या निधीची पालिकेने आधीच तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तुमच्या नाकर्तेपणामुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे निधी अभावी हे कामही अर्धवट राहिले. स्वच्छता अभियानात पाचगणी, कराड शहरांनी बाजी मारली पण, जिल्ह्यातील मोठी पालिका असलेला सातारा शेवटी, हे भूषणावह आहे का?", असा सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे भोसले यांना केला आहे.
सातारकर नारळ देणार; शिवेंद्रसिंहराजे भोसेलेंची उदयनराजे भोसलेंवर टीका
"केवळ शोबाजी करायची आणि बोलबच्चनगिरी करून मीच कैवारी असा कांगावा आणि दिखावा करायचा हे सातारकरांना नवीन नाही. तेच- तेच डायलॉग मारणे आता बंद करा. समोरासमोर या म्हणजे नेमकं काय? जिल्हा बँक निवडणुकीत तुम्ही संचालक म्हणून बिनविरोध झाल्यावर सुरुची बंगल्यावर आला. माझी भेट घेऊन मला मिठाईचा बॉक्स दिला आणि आभार मानले. त्यावेळी मी समोरच होतो ना. आणखी कसले समोरासमोर पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या कुकर्मावर पडदा टाकण्यासाठी वापरत असलेले तेच-ते डायलॉग आता बदला. सातारकरांना आता त्याचाही कंटाळा आला आहे. तुम्ही किती आणि कसला विकास केला हे सुज्ञ सातारकरांनी पहिले आहे आणि त्यामुळेच सातारकर तुम्हाला 'नारळ' दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत", अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा