विधानसभेत अजितदादांची फटकेबाजी, म्हणाले आमदारांनी जरा खरं बोलावं

ब्युरो टीम : ‘शिवसेनेचे जे आमदार माझ्याकडे आले, त्यांना मी कधी मोकळ्या हाताने परत पाठवलं नाही. निधी दिला म्हणजे उपकार केला नाही, पण मी भेदभाव करणारा माणूस नाही, हे मला सांगायचंय. पण माझी आणि राष्ट्रवादीची जी बदनामी होत आहे, ती आमदारांनी थांबवावी. जरा खरं बोलावं,’ अशा शब्दात बंडखोर सेना आमदारांना प्रत्युत्तर देत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली.
अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यांनी सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. पवार म्हणाले, ‘ राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला. मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही हे तुम्हाला माहितीय. आमदार निधी मीच दोन कोटी रुपयांवर नेला. २८८ आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता. कसलाच भेदभाव केला नाही. तुम्ही सातत्याने अन्याय केला असं म्हणता. शिंदेसाहेब आपण खाजगीत बोलत होतो. पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता. सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला. शिवभोजन थाळी केंद्राच्या वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या.मग माझं काय चुकलं,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
अजित पवार यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. या भाषणात फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कृर्तत्त्वाचा पाढा सभागृहात वाचला. त्यांच्या याच वक्तव्यांचा धागा पकडत अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित करीत जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, ‘देवेंद्रजी, मी तुमचं भाषण बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदे यांचं इतकं समर्थन केलंत. एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ दिले होते. एकनाथ शिंदे एवढे कर्तृत्त्ववान होते तर त्यांना फडणवीसांनी एकच खाते का दिले? नेता मोठा असला, त्याचं वजन जास्त असलं की, त्यांच्याकडे जास्त खाती असतात हे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना माहिती असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, नियोजन, महसूल, वन, कृषी आणि सहकार इतक्या खात्यांचा कारभार होता. जर राज्याचे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढेच सर्वगुणसंपन्न होते तर मग त्यावेळी तुम्ही त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ का दिले? या खात्याचा जनतेशी थोडाही संबंध नव्हता. फक्त रस्ते आणि बोगदे बांधायेच, हेच त्यांचे काम होते. या सगळ्या गोष्टींवर विचार झाला पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने