ब्युरो टीम : भावजयीला गावठी कट्टा दाखवताना दिराकडून ट्रिगर ओढलं गेल्याने गोळी थेट भावजयीच्या डोक्यातून आरपार झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या भावजयीवर रुग्णालयात उपचार उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असून फरार झालेल्या आरोपी दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे आज, गुरुवारी (७ जुलै) सकाळी ही घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल भालेराव हा महिलेचा दिर आहे. त्याने बाहेरून गावठी कट्टा आणला होता. हा गावठी कट्टा भावजयी सुनिता भालेराव (वय ३२) यांना दाखवत असताना आरोपीकडून ट्रिगर ओढला गेला आणि गोळी सुनिता भालेराव यांच्या डोक्यात आरपार घुसली. घटना घडल्यानंतर आरोपी दिर घटना स्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती समजताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस हवालदार नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, फरार झालेला आरोपी विशाल भालेराव याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
टिप्पणी पोस्ट करा