विरोधी पक्ष नेते अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे महत्वाची मागणी


ब्युरो टीम:
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
राज्यात यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून यामुळं शेतीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तब्बल ८ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. यापार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
पूरग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांमध्ये शेतांचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाल्याचीही शक्यता आहे. यंदाच्या वर्षी १५२ लाख हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. जूनमध्ये मान्सून आला, मात्र नियमित पाऊस नव्हता. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात यायला खूप वेळ लागला. या काळात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात तर पडला. मात्र पेरणीनंतर आलेला धुवाँधार पाऊस आणि पुरामुळे पिकं अक्षरशः पाण्यात गेली. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात पुढच्या सात दिवसांमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने