शिंदे सरकारची आज मोठी कसोटी

ब्युरो टीम :  महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात येणार आहे.  यापार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,असा संदेश दिला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आकडा आहे, बहुमत आहे, विरोधकांकडे काय आहे? अशी विचारणा केली आहे. तसंच आपण कधीही मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने