संजय राऊतांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात, ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनाची हाक

 

ब्युरो टीम: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष खिळखिळा झाला असताना आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खासदार संजय राऊत यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेकडून संजय राऊत  यांच्या अटकेच्या निषेधार्थ सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने ईडीच्या कार्यालयाबाहेरील वातावरण तापण्याची शक्यता आहे. ईडीने ही शक्यता लक्षात घेऊनच कालपासूनच कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेडस लावून नाकांबदी केली होती. तसेच याठिकाणी सीआरपीएफच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

     संजय राऊत यांच्या घरावर रविवारी सकाळी सात वाजता ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर शिवसैनिक दिवसभर संजय राऊत यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. संध्याकाळी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संजय राऊत यांना दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात आणले तेव्हाही याठिकाणी शिवसैनिकांची गर्दी होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊत यांच्यासाठी मैदानात उतरून आंदोलन करणार आहे. संजय राऊत यांच्यावर नेहमीच ते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे असल्याच्या आरोप होतो. त्यामुळेच की काय राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांच्यापाठी आपली ताकद उभी केली आहे.

        यापूर्वीही संजय राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते तेव्हाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. पवार यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईबाबत काही मुद्दे पंतप्रधानांसमोर ठेवले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन नेते तुरुंगात असताना शरद पवार यांनी पंतप्रधांसमोर केवळ राऊतांचा मुद्दा मांडला होता. तेव्हादेखील शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील विशेष सख्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्यानिमित्ताने हा स्नेहभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने