ब्युरो टीम : ‘शिवसेना जे सोडून जातात ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं म्हणण्यात आलं. पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडून येण्याची चिंता करण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला. आज, सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेला बहुमताचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सभागृहात मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते
‘आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली या गोष्टीचं आम्हाला दु:ख आहे. ही गोष्ट आमच्या मनातही सलत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्याने त्यांना बावळट बनवले आहे. ज्यांची निवडून यायची लायकी नाही, ते आम्हाला बोलतात. आमच्या मतांवर खासदार होतात, अशी टीकाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
आमच्यावर टीका केली गेली. तुम्ही बंडखोर झाले असे म्हणण्यात आलं. आम्हाला जे मिळालंय ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाहीये. आम्ही उठाव केला आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत न घेण्यासाठी या विचारावर आम्ही पुन्हा आलो आहोत. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. गुलाबराव तुला टपरीवर पाठवेन, असे म्हणण्यात आले. धिरुभाई अंबानीदेखील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेच्या इतर नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
टिप्पणी पोस्ट करा