ब्युरो टीम : विधानसभेत सोमवारी झालेली बहुमत चाचणी शिंदे-फडणवीस यांनी जिंकली. यावेळी शिंदे सरकारच्या बाजूने 165 तर विरोधात 99 मतं होती. त्यामुळे शिंदे सरकारकडे स्पष्ट बहुमत पाहायला मिळालं. यानंतर आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून बंडखोर आमदारांची निष्ठा याबाबत टोले लगावले आहेत. यासोबतच फडणवीसांना देण्यात आलेल्या उपमुख्यमंत्रीपदावरुनही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
भाजप पुरस्कृत शिंदे गटाच्या सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली आहे. यात आनंद किंवा दुःख वाटावे असे काही नाही. ज्या परिस्थितीत शिंदे सरकार बनवले आहे त्यामागची प्रेरणास्थळे पाहता महाराष्ट्रात दुसरे काही घडेल याची खात्री नव्हती. संतोष बांगर हे हिंगोलीचे आमदार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले व चोवीस तासांत असे काय घडले की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे ‘निष्ठावान’ शिंदे गटाच्या कॅम्पात शिरले. शिवसेनेत राहिल्याबद्दल या निष्ठावान आमदाराचे हिंगोलीत लोकांनी भव्य स्वागत केले. त्यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली. आमदार म्हणून विजयी झाले तेव्हाही लोकांनी असे स्वागत केले नव्हते, असे सांगून कपाळास उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले. तेच बांगर सोमवारी शिंदे गटात पळून गेले. त्यामुळे विश्वास फक्त पानिपतातच पडला असे नाही, तर प्रत्यक्ष महाराष्ट्रातही अनेक ‘विश्वासराव’ पळून गेले.
बहुमत चाचणीत भाजपपुरस्कृत शिंदे गटास 164 आमदारांनी पाठिंबा दिला व विरोधात 99 मते पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. विधानसभेत भाजप व शिंदे गटाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला. हे चोरलेले बहुमत आहे. हा काही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विश्वास नाही.
शिंदे गटावर विश्वास व्यक्त करताना भाजप आमदारांची डोकीही अस्वस्थ झाली असतील. फडणवीस यांचे अभिनंदनाचे भाषण हे सरळ सरळ उसने अवसान असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो, असे विधान यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गमतीचे आहे. ज्या प्रकारे ते आले ते त्यांच्या स्वप्नातही नसेल. आधीची अडीच वर्ष ते आलेच नाहीत व आताही दिल्लीच्या तडजोडीने ते लंगड्या घोड्यावर बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत याचा विसर त्यांना पडू नये.
महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यात तत्त्व, नैतिकता आणि विचारांचा कोठे लवलेशही दिसत नाही. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असे भासवून चाळीसेक लोक विधिमंडळातून बाहेर पडतात. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय? सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे
सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. 106 आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि 39 बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गर्भितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहेत, पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल.
शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे. शिंदे हे म्हणे शिवसेना-भाजप ‘युती’चे मुख्यमंत्री असल्याचे जाणीवपूर्वक बोलून लोकांत भ्रम पसरवला जातो. हीच तर भाजपची कपटी खेळी आहे. 2014 साली याच लोकांनी ‘युती’ तोडली. 2019 साली याच लोकांनी ‘युती’चा म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मग आता फडणवीस कोणत्या युतीची शेखी मिरवत आहेत. श्री. भास्कर जाधव विधानसभेत मुद्द्याचे बोलले. मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. नियती कुणाला सोडत नाही. ज्यांच्या मागे ईडी लावली त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन संरक्षण द्यावे लागले.
श्री. जाधव म्हणतात, त्यावर बोला. याच ‘ईडी-पीडी’ आमदारांच्या मतांवर शिंदे गटाचे राज्य भाजपने आणले ते काय बहुमत आहे? शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल, पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे!
टिप्पणी पोस्ट करा