उद्धव ठाकरेंची तानाजी सावंतावर मोठी कारवाई; जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

 


ब्युरो टीम: एकनाथ शिंदे गटातील बंडखोर शिवसेना आमदार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर आता तानाजी सावंतकाय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांना तानाजी सावंत यांच्या पुणे आणि सोलापूरमधील कार्यालयांची तोडफोड केली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिला होता. आता मात्र त्यांच्यावर थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला जाणार आहे. यावेळी निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास शिवसेनेची अडचण होऊ शकते.

         या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सचिवालयाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या व्हीपचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर विधिमंडळ सचिवालयाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी या नोटीस जारी केल्या आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

          एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे परभरणीचे खासदार संजय जाधही एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. संजय जाधव हे रविवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पंढरपूरमध्ये दिसून आले. महापूजा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंदिरातच संजय जाधव यांचा सत्कार केला. संजय जाधव यांच्या समर्थकांकडून ते शिवसेनेतच असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता संजय जाधव हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने