ठाकरेंना मोठा धक्का! सेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी शिंदेच

ब्युरो टीम : विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील इतर आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 
मागील काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांचा पाठिंबा आहे, तर ठाकरे गटाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. ठाकरे गटाच्या संबंधित आमदारांनी आज  शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेला पक्षाचा व्हीप पाळला नाही, व त्यामुळे या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी नोटीस जारी केली, तर कायद्यानुसार आदित्य ठाकरेंसह उर्वरित १५ आमदार निलंबित होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळेच विधीमंडळानं एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता देणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्याजागी विधीमंडळ गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण विधीमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द केली आहे.याशिवाय विधीमंडळ सचिवालयाने सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदावरील नियुक्ती देखील रद्द केली आहे. तसेच शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती योग्य ठरवली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने