ठाण्यातील शिवसैनिकांनी खासदार राजन विचारे यांच्यासह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. राज्यपालपदावर बसलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मीठ खाऊन मराठी माणसाचाच अपमान केला. संजय राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई हा त्याचा पुढचा टप्पा आहे. हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठी-अमराठी वाद निर्माण करून मराठी माणसाला चिरडून टाकायचे, असे भाजपचे कारस्थान आहे. हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी शिवसेना एकदा संपली, की महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना नाते तोडून जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, असा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
लाजलज्जा, शरम सोडून देशात दडपशाही सुरू, उद्धव ठाकरे संतापले
ब्युरो टीम : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पाहुणे दाखल झाले. हे काय चालले आहे? हे सगळे कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चालले आहे की लाजलज्जा, शरम सोडून देशात दडपशाही सुरू आहे, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू व महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो, हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा