ब्युरो टीम : १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त अहमदनगरच्या पसायदान अकादमीने आगळा वेगळा प्रकल्प हाती घेतलेला आहे. "मी हिंदुस्तानी" या एकांकिकेचे ११ जुलै ते १५ ऑगस्ट या ३५ दिवसात ७५ प्रयोग करण्याच्या संकल्प केलेला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी चार प्रयोग करणार आहेत. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे.
भारतीय संस्कृती, संस्कार, चालिरीती,.परंपरा, शिक्षण पद्धति, हिंदुस्तानी वैशिष्ठ्ये यातून निर्माण होणारा जुन्या व नव्या पीढीतील संघर्ष "मी हिंदुस्तानी" या एकांकिकेत लेखक तेजस परसपाटकी व पी. डी. कुलकर्णी यांनी सुंदर पणे उभा केलाय.
या एकांकिकेचे दिग्दर्शन स्वतः पी. डी. कुलकर्णी करीत असून त्यात पी. डी. कुलकर्णी व कोमल पाटील भूमिका करीत आहेत. त्यांना निर्मितीसाठी सर्वतोपरी सहाय्य शैलेश देशमुख, कल्पना नवले, सरिता पटवर्धन व करीत आहेत. शैलेश देशमुख हे संगीत देत असून सुधीर देशपांडे यांचे नेपथ्य आहे. पुण्यातील यतीन कुलकर्णी हे संपूर्ण ध्वनी यंत्रणा संभाळत आहेत. सौ.सुलभा कुलकर्णी या सूत्रधार आहेत.
या दीर्घांकातील आशय जितका महत्वाचा आहे तितकीच कलाकारांचं वय, हेतू ,इच्छाशक्ती, संकल्प आणि समाजाप्रती, देशाप्रती असणारी बांधिलकी जास्त वाखाणण्याजोगी आहे. कारण एवढ्या कमी वेळात ७५ प्रयोगांचं नियोजन, आयोजन आणि सादरीकरण ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. त्या साठी लागणारे अपार कष्ट सर्व जण मनापासून घेत आहेत. त्यात महत्वाची बाब ही की हे सर्व प्रयोग हे कुठलेही मानधन न स्वीकारता अगदी विनामूल्य तत्वावर फक्त देशप्रेमाचा विचार समाजमनात रुजावा या हेतूने केला जात आहे. अश्या विक्रमी स्वरूपाचा नगरच काय, संपूर्ण महाराष्ट्रातून होणारा एकमेव प्रकल्प असावा. या एकांकिकेचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात होत असून १ ऑगस्ट पासून नगर शहर आणि जिल्ह्यात होत आहेत. कुणाला जर प्रयोग आयोजित करण्याची इच्छा असेल 9850057222 या नंबरवर संपर्क करावा. १५ ऑगस्ट रोजी संकल्प पूर्ती निमित्त एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे अशी माहिती पी. डी. कुलकर्णी यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा