ब्यरो टीम : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेले एक ट्विट लक्षवेधक ठरले आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहून राजकारण सोडण्याचा विचार मनात येत असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटत आहेत. राऊत यांच्यावरील कारवाई आवाज दाबण्यासाठीच करण्यात आली, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांनीही या कारवाईविरोधात भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपवर जोरदार टीका करत संजय राऊतांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हेदेखील सातत्याने ट्विटरवर आपली मते मांडत असतात. संजय राऊतांवर झालेल्या कारवाईविरोधातही त्यांनी ट्विटरवर परखडपणे आपले मत मांडले आहे. तसंच, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपला टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे, आज दिवसभरातील राजकीय घडामोडी बघून आठवड्याभरापूर्वी मा. गडकरी साहेबांनी राजकारण सोडण्यासंदर्भात जी भावना बोलून दाखवली होती, तशीच भावना आज माझीही झालीय. परंतु अशी परिस्थिती बदलण्याची ताकद युवांमध्ये असल्याने त्यांच्याकडं पाहून बळ मिळतं, असं सूचक ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली. त्याआधी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये ११.५० लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. पत्राचाळ पुनर्विकासप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
प्रकरणाची व्याप्ती वाढणार
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांनी 'डीएचएफएल'कडून कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केला. 'डीएचएफएल'चे मुख्य प्रवर्तक वाधवान बंधू यांनीदेखील मोठ्या प्रमाणात येस बँकेच्या कर्जाऊ रक्कमेचा गैरवापर केल्याने ‘ईडी’कडून त्यांचा तपास सुरूच आहे. तर येस बँकेचे मालक राणा कपूर हेदेखील मनी लॉन्डरिंग प्रकरणात ‘ईडी’च्या अटकेत आहेत. यामुळे एकंदरच या प्रकरणाची व्याप्ती आता वाढण्याची शक्यता आहे.
---------------
टिप्पणी पोस्ट करा