ब्युरो टीम:सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सोडतीची अधिसूचना आज, मंगळवारी (दि. २६) प्रसिद्ध केली जाणार आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार ओबीसी आरक्षित जागांची रचना करताना केवळ पूर्णांक संख्या गृहीत धरल्याने ओबीसींची एक जागा घटणार आहे. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३५.९१ कोटा येतो. परंतु, पूर्णांकच गृहीत धरला जाणार असल्याने ३५ जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. यापूर्वीची महिला आरक्षण सोडत रद्द करण्यात आली असून, नव्याने ओबीसींच्या ३५ जागांसह सर्वसाधारण महिला आरक्षण काढले जाणार असल्याने इच्छुकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता यापूर्वी काढलेल्या आरक्षण सोडतीत काही प्रमाणात फेरबदल होणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी यापूर्वीच अनुसूचित जाती, जमातीच्या २९ जागांसह सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षण सोडत काढली आहे. मात्र, आता ओबीसींसाठी नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात ही सोडत काढली जाणार आहे. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५.९१ जागांचा कोटा येतो. त्यामुळे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३६ जागा उपलब्ध होतील, असे सांगितले जात होते. परंतु, अपूर्णांकसंख्या गृहीत न धरण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश असल्यामुळे ओबीसींची एक जागा घटली असून, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आता ३५ जागांसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे नाशिकमधील ओबीसींची एक जागा घटली असून, सर्वसाधारण गटाची एक जागा वाढली आहे. २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर ३० जुलै ते २ ऑगस्ट यादरम्यान या आरक्षण सोडतीवर हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण पाच ऑगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त (प्रशासन) तथा निवडणूक समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली आहे.
६९ जागांचे निघणार आरक्षण
अनुसूचित जातीच्या १९ व अनुसूचित जमातीच्या १० अशा प्रकारे २९ जागा वगळून उर्वरित १०४ सर्वसाधारण जागांसाठी ही आरक्षण सोडत असणार आहे. यापूर्वीचे महिलांचे सर्वसाधारण आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे १०४ जागांमधून सर्वप्रथम ओबीसी अर्थात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या गटासाठी ३५ जागांची सोडत काढली जाईल. त्यानंतर या ३५ जागांमधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी १८ जागांची सोडत काढली जाईल. यानंतर उर्वरित सर्वसाधारण जागांमधून महिलांसाठी ३४ राखीव जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा