ब्युरो टीम : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अशा पावसात गाडी चालवणे अवघड होतं आहे. मात्र एका स्विगी डिलिव्हरी एजंटने ऑर्डर पोहचवण्यासाठी चक्क घोड्यावरून प्रवास केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. त्यातच, काल, मंगळवारी (५ जुलै) स्विगीने ट्विट करत, या घोडेस्वारी करणाऱ्या अज्ञात डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला ओळखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
संततधार पावसामुळे मुंबईतील एका भागात पाणी साचले होते. अशावेळी ऑर्डर पोहचवण्यासाठी स्विगी डिलिव्हरी बॉय चक्क घोड्यावरून जाताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत होता. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, डिलिव्हरी करण्याची ही अनोखी पद्धत सर्वांसमोर आली. या व्हिडिओची दखल स्विगीने घेतली आहे.
स्विगीने एका निवेदनात म्हटले आहे की, ते व्यक्ती ओळखण्यात अक्षम आहेत. त्यांनी म्हटलंय, 'हा शूर तरुण स्टार कोण आहे?” स्विगीच्या या वक्तव्यावर ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे.
'तो तुफान चालवत आहे की बिजली? त्याच्या पाठीला बांधलेल्या बॅगेत काय आहे? पावसाळ्याच्या दिवसात मुंबईचा गजबजलेला रस्ता ओलांडण्याचा तो इतका निर्धार का करतो? जेव्हा तो ही ऑर्डर देण्यासाठी गेला तेव्हा त्याने आपला घोडा कुठे पार्क केला?' असे प्रश्नही स्विगीने या निवेदनात विचारले आहेत. तसेच, त्यांनी पुढे म्हटलंय की,'स्विगी-वाइड हॉर्स हंट' लाँच केले गेले आहे आणि जो कोणी या ‘अॅक्सिडेंटल ब्रँड अॅम्बेसेडर’ बद्दल माहिती देऊ शकेल त्याला त्याच्या स्विगी मनीमध्ये ५००० रुपये मिळतील.
स्विगीच्या या निवेदनावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा