शिंदे गट - भाजपवर ठाकरी आसूड; ठाकरेंच्या खास मुलाखतीचा पहिला प्रोमो आला

ब्युरो टीम : 'तुम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वत:ची तुलना करायला लागलात?, असे प्रश्नांचे बाण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. 
दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. या मुलाखतीचा पहिला प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोत उद्धव ठाकरे हे अतिशय शांत आणि संयमाने शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षावर आसूड ओढताना दिसत आहे.
'तुमच्यात कर्तृत्व नाही आहे, तुमच्यात हिंमत नाही आहे. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात, अशा शब्दांत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थकांवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वात शिवसेनेत  उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या बंडानंतर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. इतकेच नाही, तर आता शिवसेना खरी कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार?, याचा फैसलाही निवडणूक आयोगापुढे होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. 
राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न  प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतात. राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने उत्तरे दिलेली आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर टीकेचे आसूड ओढण्यात आल्याचे दिसत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने