सोनिया गांधीची ईडी चौकशी, नगर शहरात काँग्रेसचे धरणे

ब्युरो टीम : सोनिया गांधींची ईडी चौकशी मोदी सरकारने सुरू केली आहे. काँग्रेस नेतृत्वाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केंद्रात सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे. माध्यमांमध्ये गैरसमज निर्माण करून जनतेची दिशाभूल सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र राबवित आहे. असे असले तरी देखील सबंध देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी चौकशीला बोलावून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या मोदी सरकार चा निषेध करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहरात जुन्या बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलने काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हार घालून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी बंद करा, बंद करा, तपासांतरांचा गैरवापर बंद करा, संविधान विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

आ.थोरात म्हणाले की, सोनिया गांधी आजारी होत्या. त्यातून त्या बऱ्या होवून विश्रांती घेत होत्या. मात्र ईडीने लगेचच त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. त्यांनी यंत्रणांना  पूर्ण सहकार्य केले. तरी देखील बाहेर गैरसमज पसरवला गेला की त्या वेळ वाढवून मागत आहेत. या उलट निघताना सोनिया गांधींनी ईडीच्या तपासी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, 'मै इंदिराजी की बहु हुं, डरती नही.' गांधी कुटुंबीयांनी देशासाठी दिलेले बलिदान जनतेला माहित आहे. नॅशनल हेरॉल्ड यामध्ये कोणताही घोटाळा नसताना देखील गैरसमज निर्माण केला जात आहे. त्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत. 

खूप झाली दडपशाही देशात हवी लोकशाही, ईडी, आयटी, सीबीआय असल्या धमक्यांना आम्ही भी घालत नाय, लावल्या चौकशा जरी कितीही मागे आम्ही हटणार नाही, मोदी सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालणार नाही, देशासाठी बलिदान देणाऱ्या गांधी कुटुंबावर आरोप करताना लाज कशी वाटत नाही ? असे फलक अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये झळकत होते. 

यावेळी आ. लहू कानडे, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, साई संस्थानचे विश्वस्त करण ससाने, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव हेमंत ओगले आदींची आक्रमक भाषणे झाली. 

मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके पाटील, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अंकुश कानडे, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, हनिफभाई जहागीरदार, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, शहर सचिव गणेश आपरे, शहर सहसचिव शंकर आव्हाड, विनोद दिवटे, भिंगार काँग्रेस शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, निलेश चक्रनारायण, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, जरीना पठाण, शारदा वाघमारे, कौसर खान, संगमनेर शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष माधवराव कानवडे आदींसह अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, सर्व फ्रंटल, आघाड्या, सेल यांचे प्रमुख, त्यांचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने