ब्युरो टीम : मुसळधार पावसामुळे मुंबईची अवस्था बिकट आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार आणि इतर अधिकाऱ्यांची पावसाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईतील परिस्थितीवर मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.
तसेच रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी. तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून एनडीआरएफ जवानांना तसंच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा