ब्युरो टीम : 'आज तुम्ही ज्या चार लोकांना बदनाम करत आहात, ते शिवसेनेचे निष्ठावंत आहेत,' असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगतानाच शिवसेनेतील बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या बंडखोर आमदारांकडून संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या चार डोक्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, असा बंडखोर आमदारांचा सूर होता. या टीकेला राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले, 'या चार लोकांमुळेच कालपर्यंत तुम्हाला मिळाली होती. हे चार लोक सतत पक्षाचेच काम करत होते. आजही हे चार लोक पक्षाचेच काम करत आहेत. गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यापूर्वीही तुम्ही सरकारमध्ये होता. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नव्हेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे हे स्वत:चे निर्णय स्वत: घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. तुम्ही आता पक्षातून निघून गेले आहात, आता आपलं काम करा, अशा शब्दांतही राऊत यांनी बंडखोरांना सुनावले.
यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना आगामी काळात महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणले, असा दावाही केला.
टिप्पणी पोस्ट करा